महाविकास आघाडी आणि महायुतीत अजित पवार" किंग मेकर " ठरणार?

Dhak Lekhanicha
0

 महाविकास आघाडी आणि महायुतीत अजित पवार" किंग मेकर " ठरणार?




 शिरूर : सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)

भाजपाकडून टोकाचा विरोध होत असलेले नेते नवाब मलिक यांनी नुकतंच एक सूचक विधान केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं. येत्या २३ तारखेनंतर काही गणित बदलू शकतात. तसे कोण कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. २०१९ सारखी नवी समीकरणं समोर येऊ शकतात, अशी विधानं नवाब मलिक यांनी केली. केवळ नवाब मलिकच नाही तर सध्या अजित पवार गटात असलेल्या, पण एकेकाळी शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनीही असंच विधान केलं आहे. निवडणूक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं ठरणार असून, त्यानंतर खरं गणित सुरू होणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर, अजित पवार यांना सोबत घेणं सध्या शक्य नसल्याचं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्यामधून अजितदादांसाठी परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय, असं मात्र काही त्यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत जुळवाजुळवीला वाव आहे.


आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. मात्र मुख्यमंत्रिपद भूषवण्याची अजित पवार यांची महत्त्वाकांक्षा कधी लपून राहिलेली नाही. तसेच त्यांनीही कधी ती लपवून ठेवलेली नाही.अजितदादांचे समर्थकही अनेकदा त्यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करतात. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा लागतो. तो मिळाला की मी मुख्यमंत्री होईन, असं सांगून अजित पवार हे वास्तवाची जाणीव करून देत असतात. मात्र तशी संधी आल्यास ती अजितदादा सोडण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच तशी संधी अजित पवार यांना यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मिळू शकते, अशी राजकीय परिस्थिती सध्या राज्यात आहे.


सद्यस्थितीत महाराष्ट्रात अटीतटीची लढत होण्याचे आणि महायुती व महाविकास आघाडी यांची स्पष्ट बहुमत मिळवताना दमछाक होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामधून अजित पवार यांच्या पुढील भूमिकेबाबत तीन प्रमुख शक्यता समोर येत आहेत. त्यामधील पहिली शक्यता म्हणजे सध्या सत्तेवर असलेली महायुती कशीबशी १४५ जागांपर्यंत पोहोचली, तसेच त्यात अजित पवार यांच्याकडे आमदारांची समाधानकारक संख्या असेल तर अजित पवार हे 'किंगमेकर'च्या भूमिकेत जातील. तसेच सरकारमध्ये मोठा वाटा मागतील. मात्र महायुती सोडणार नाहीत.

 

दुसरी शक्यता म्हणजे शिंदे गट आणि भाजपाला एकत्रितपणे बहुमताच्या १४५ या आकड्याजवळ पोहोचता आले नाही तर महायुतीमधील अजित पवार यांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच परिस्थितीचा अंदाज घेऊन ते मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तिसरी शक्यता म्हणजे अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या आकड्यामुळे महाविकास आघाडी बहुमताच्या पार जाणार असेल तर राजकीय जुळवाजुळवीसाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार अजित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. या परिस्थितीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण करून मुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली जाऊ शकतो किंवा स्वत: अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. एकूणच विधानसभा निवडणुकीनंतर अनुकूल संख्याबळ मिळालं, तर अजित पवार हे निश्चितपणे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून किंगमेकर किंवा किंग बनण्यासाठी प्रयत्न करतील. आता या सर्व परिस्थितीत अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!